खादी ग्रामोद्योगच्या दिनदर्शिका आणि रोजनिशीवर नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापण्यावर पंतप्रधान कार्यालयाने नाराजी दर्शवली आहे. छायाचित्र छापताना पंतप्रधान कार्यालयाची परवानगी घेण्यात आली नव्हती अशी माहितीही समोर येत असून याप्रकरणी संबंधीत मंत्रालयाकडून खुलासाही मागवण्यात आली आहे.

खादी ग्रामोद्योगाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशींवर महात्मा गांधींचे चरख्यावर सूत कातत असलेले छायाचित्र हटवून त्या जागी मोदींचे छायाचित्र झळकले आहे. यावरुन विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे. मात्र या प्रकारावर पंतप्रधान कार्यालयाने नाराजी दर्शवली आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने संबंधीत विभागाकडून खुलासाही मागवला आहे. पंतप्रधानांना खूश करण्यासाठी किंवा त्यांच्यासोबतची जवळीक दर्शवण्यासाठी यापूर्वीही मोदींच्या छायाचित्रांचा वापर झाल्याचा दावा पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी खासगीत करतात. यापूर्वी रिलायन्स जिओ आणि मोबाईल वॉलेट कंपनी पेटीएमच्या जाहिरातींमध्येही नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापताना पंतप्रधान कार्यालयाची मंजूरी घेण्यात आली नव्हती.

[jwplayer 6RuGCHxd]

खादी ग्रामोद्योगाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशींवर महात्मा गांधींच्या छायाचित्र असते. पण यापूर्वी किमान पाच वेळा गांधींऐवजी सर्वसामान्य व्यक्तींच्या छायाचित्राचा वापर यात झाला होता याकडे अधिका-यांनी लक्ष वेधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि खादी समर्थक म्हणून असलेली प्रतिमा यामुळेच यंदा मोदींच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला असे ग्रामोद्योगातील अधिका-यांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मोदींनी महिलांमध्ये सुमारे ५०० चरख्यांचे वितरण केले होते. त्यावेळीच दिनदर्शिका आणि रोजनिशीवर मोदींच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला होता. मोदी सत्तेवर येण्यापूर्वी खादीच्या विक्रीत २ ते ७ टक्क्यांनी वाढ व्हायची. पण मोदी सत्तेत आल्यापासून खादीच्या विक्रीत तब्बल ३४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.

दिनदर्शिकेवरील मोदींच्या छायाचित्रामुळे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी खादी आणि गांधीजी हे आपला इतिहास, आत्मसन्मान आणि संघर्ष यांचे प्रतीक आहे. गांधीजींचे छायाचित्र हटवणे हे पाप आहे, अशी टीका केली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोदींवर तोंडसुख घेताना गांधीजी राष्ट्रपिता होते, मोदी कोण आहेत, असा सवाल केला होता.