भ्रष्टाचाराने गरिबांचे नुकसान केले. त्यांना लुटले आहे. गरिबांना उद्ध्वस्त केले आहे. आता भ्रष्टाचाराला दंडुका घेऊन हटवायला हवे. भ्रष्टाचाऱ्यांना ठिकाण्यावर आणायला हवे. मी भ्रष्टाचाराविरोधात लढाई पुकारली आहे. हा काय माझा गुन्हा आहे का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला आहे. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे आज, शनिवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

मी भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढत आहे. पण मला आपल्याच देशातील लोक मला गुन्हेगार समजत आहे. यामुळे मी हैराण झालो आहे. भ्रष्टाचाऱ्यांचे वाईट दिवस आले आहेत, हाच मी गुन्हा केला आहे. गरिबांना त्यांचे हक्क देण्याचे काम करत आहे, हा माझा गुन्हा आहे का, असे सवालही त्यांनी विरोधकांना केले.

उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. सभेला मोठी गर्दी झाली होती. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना गरिबी, विकास, भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवर जोर दिला. देशाला गरिबीपासून मुक्त करण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांतून गरिबी हटवायला हवी. तरच देश गरिबीपासून मुक्त होईल, असे ते म्हणाले. लोकसभेची निवडणूक मी उत्तर प्रदेशातून लढलो. लोकांनीही मला आशीर्वाद दिले. मी फक्त खासदार होण्यासाठी निवडणूक लढलो नाही. तर देशातील सर्वात मोठ्या राज्यातून गरिबी हटवण्यासाठी ही निवडणूक लढलो आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभेतील जनतेने मोदी…मोदी अशा जोरदार घोषणा दिल्या.

मोदी यांनी आपल्या भाषणावर विकासावरही भर दिला. विकास झाला तरच रोजगार उपलब्ध होईल. मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळेल. ज्येष्ठांना कमी पैशांमध्ये उपचार मिळतील. सर्वांना राहायला हक्काचे घर मिळेल. वीज, पाणी पुरेशा प्रमाणात मिळेल. माता – भगिनींच्या जीवनात एक प्रकारे बदल होईल. त्यामुळे विकासालाच आमचे प्राधान्य असेल, असे त्यांनी ठासून सांगितले.

नुसत्या घोषणा करणारी सरकारे खूप आली. पण घोषणा करून हिशेब देणारे सरकार पहिल्यांदाच आले आहे. राज्यातील ९५० गावांमध्ये आतापर्यंत वीज पोहोचवण्यात आली आहे. मी तर आश्वासन दिल्यानंतर आता उत्तर प्रदेशात आलो आहे. पण माझ्या येण्याआधीच दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे, असेही त्यांनी सांगितले. देशाचा विकास फक्त भाजपच करू शकतो, असेही ते म्हणाले.

जनताजनार्दनच माझा हायकमांड

यावेळी मोदी यांनी राज्यातील जनतेच्या भावनांनाच हात घातला. जनताजनार्दनच माझा हायकमांड आहे. माझा कुणी राजकीय नेता नाही. माझा कुणी हायकमांड नाही, असेही ते म्हणाले.

प्रामाणिक लोकच बँकांसमोर रांगा लावतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीला विरोध करणाऱ्यांवर हल्ला चढवला. गरिबांचे लुटलेले पैसे, नोटांचे बंडल लपवून ठेवणारे आता ते बंडल बाहेर काढत आहेत. तेच आता गरिबांचे पाय पकडत आहेत. भ्रष्टाचारातून पैसे गोळा करणारे आता गरिबांच्या घरासमोर रांगा लावत आहेत. पण प्रामाणिक लोक बँकांसमोर रांगा लावत आहेत, असे त्यांनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याची ओरड करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी सुनावले. तुम्ही देशातील गरिबांना ७० वर्षांपासून रांगेत उभे राहायला लावले आहे. पण आता मी ही शेवटची रांग लावली आहे, असे सांगून त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली.