भाजपच्या आधी सत्तेवर असलेल्या सरकारने सरकारी तिजोरीचा उपयोग विकासासाठी नाही तर निवडणुका जिंकण्यासाठी केला. विकास हा शब्दच आधीच्या सरकारला आणि विरोधकांना आवडत नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इतर विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला.  शुक्रवारी वाराणसीत झालेल्या सभेत ते बोलत होते. वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ हजार कोटी रूपयांच्या विविध योजनांचे लोकार्पण तसेच काही प्रकल्पांचे भूमिपूजन केले. त्यानंतर त्यांनी आपली रोखठोक आणि सडेतोड भूमिका मांडली.

कोणत्याही समस्येचे उत्तर विकासामध्येच असते, भाजपच्या आधी जे सरकार आले त्यांना विकास या शब्दाचा तिटकारा होता. मात्र विकास साधून आम्हाला गरीबांचा उद्धार करायचा आहे. प्रत्येक गरीब माणूस जे स्वप्न पाहतो ते पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. तुम्ही कोणत्याही गरीब माणसाला विचारा की जसे आयुष्य तू जगलास तसे तुझी मुले जगली तर चालेल का? त्याचे उत्तर नाहीच असेल. आमचा प्रयत्न हाच आहे की देशातील तळागाळातल्या घटकांपासून सगळ्याच घटकांचा विकास व्हावा. २० ते २५ वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने खूप चांगले काम केले आहे. वाराणसीच्या विकासासाठी मागील दशकभरात जेवढे काम झाले नाही तेवढे योगी सरकारच्या काळात झाले आहे. उत्तरप्रदेश  सरकारच्या ३०० कोटींच्या गुंतवणुकीतून प्रकल्प उभे राहिले आहेत ज्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. अनेक योजनांचे भूमिपूजन होते आणि प्रकल्प प्रत्यक्षात उतरत नाही. मात्र भाजपचे सरकार असे होऊ देणार नाही असे आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.