जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपेक्षा सरस असल्याचे म्हटले आहे. मुंबई येथे आयोजित टाइम्स लिटफेस्ट या कार्यक्रमात कन्हैय्याकुमार बोलत होता. पंतप्रधान मोदींचे कन्हैय्याकुमारने कौतुक केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंतप्रधान मोदींबरोबर अनेक विषयांवर मतभेद असले तरी ते ट्रम्पपेक्षा चांगले आहेत. संपूर्ण जगात हुकूमशाही नेतृत्व उभारी घेत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली गेली. स्थलांतरित नागरिक आणि महिलांसाठीही आक्षेपार्ह भाषेचा उपयोग करण्यात आला. यापूर्वी कधीही प्रचाराचा इतका हीन दर्जा नव्हता, असे तो म्हणाला. कन्हैय्याकुमारवर देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. तसेच त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल आहे. कन्हैय्याकुमारने या वेळी महान आफ्रिकी-अमेरिकन नेता मार्टिन ल्यूथर किंगचे उदाहरण उपस्थितांना दिले. तो म्हणाला, वाईट लोक यासाठी ओरडत नाहीत की ते शक्तिशाली आहेत. परंतु चांगले लोक शांत बसल्यामुळे समाजात वाईट घटना होतात, असे त्याने सांगितले. या वेळी त्याने जेएनयूतून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नजीब अहमदविषयीही मत व्यक्त केले. सरकार काही करण्याऐवजी आमच्यासमोर विनाकारण मुद्दे उपस्थित करत आहे. सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे एक मजबूत विरोधी पक्षाची उणीव आहे. त्यामुळे असं होत असल्याचे त्यांनी म्हटले. दादरी, जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा आणि नजीबचे गायब होण्यासारखे प्रकरणाने भ्रमित केले जात आहे. दादरी प्रकरणात सापडलेले मांस हे गोमांस होते किंवा नाही याचा शोध घेतला जात होता. तर रोहित वेमुला प्रकरणात नेमलेली समिती त्याच्या जातीचा शोध घेत होती, अशी खंत त्याने व्यक्त केली. नऊ महिन्यानंतरही जेएनयू राष्ट्रविरोधी नारेबाजीप्रकरणी चार्जशीट दाखल का केली नाही, असा सवाल विचारत त्याने सरकारच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले.