दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पहिल्यांदाच रस्त्यावर उतरून प्रचार करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून केवळ प्रतिमासंवर्धनात व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली.
     कालकाजी विधानसभा मतदारसंघात राहुल गांधी यांनी ‘रोड शो’द्वारे शक्तिप्रदर्शन केले. उत्तर भारतात ओसरणाऱ्या परंतु गारठून टाकणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांची एकही सभा अद्याप दिल्लीत आयोजित केलेली नाही. भाजपची केंद्रीय मंत्री, खासदारांमार्फत प्रचाराची एक फेरी पार पडलेली असताना काँग्रेसकडून पहिल्यांदाच राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. दिल्लीत सत्ता आल्यास स्वस्त वीज व पाणी देण्याचे जुनेच आश्वासन राहुल गांधी यांनी आजच्या ‘रोड शो’दरम्यान दिले.
राहुल गांधी म्हणाले, की केंद्रात रालोआ सरकार सत्तेत आल्यापासून विकासकामे झालेली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ  ‘पीआर’ करीत आहेत. जनता मोदींच्या ‘पीआर’ला विटली आहे.
स्टंटबाजी थांबवून मोदी सरकारने विकासकामे केली पाहिजेत. राहुल गांधी यांच्या ‘रोड शो’मुळे थोडय़ाफार का प्रमाणात होईना, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संकेत गेला आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राहुल गांधी परदेशात होते. त्यामुळे काँग्रेसच्या सर्वच नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. राहुल गांधी दिल्लीत एखाददुसरी सभा घेणार आहेत.