जाती आधारित जनगणनेचे निष्कर्ष प्रसिद्ध न केल्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोमवारी निशाणा साधला. मोदी देशातील मागासवर्गीयांचे शत्रू असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. त्याचबरोबर मोदींनी लवकरात लवकर जाती आधारित जनगणनेचे निष्कर्ष जाहीर करावेत, असे आव्हानही दिले आहे.
ते म्हणाले, आपण मागासवर्गीय समाजातून आलो असल्याचे मोदी सांगत असले, तरी खरंतर ते मागासवर्गीयांचे शत्रू आहेत. जर ते खरंच मागासवर्गीय घरातून आले असतील, तर त्यांनी जाती आधारित जनगणनेचे निष्कर्ष लवकरात लवकर प्रसिद्ध केले पाहिजेत.
ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यासाठी लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी पाटण्यातील राजभवनावर मोर्चा काढण्यात आला. ही आकडेवारी लपवून ठेवण्यामागे मोदी सरकारचा काय हेतू आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यूपीए सरकारच्या काळात आम्ही केलेल्या मागणीमुळेच जाती आधारित जनगणना करण्यात आली होती, असे सांगून त्याचे निष्कर्ष आम्हाला कळलेच पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.