नांदेड- हैदराबाद विमानप्रवास आता फक्त अडीच हजार रुपयात शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘उडान’या योजनेचे गुरुवारी उद्घाटन झाले असून शिमला- दिल्ली, कडप्पा- हैदराबाद, नांदेड- हैदराबाद या मार्गांवर ही सेवा सुरु झाली आहे. ‘सब उडे, सब जुडे’ असा नाराच मोदींनी याप्रसंगी दिला.

विमान प्रवासाचा खर्च ताशी २५०० रुपयांपर्यंत मर्यादित करणारी ‘उडान’ही योजना मोदी सरकारची आणखी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ‘उडे देश का आम नागरिक’ (उडान) अशी ही योजना असून अधिकाधिक ठिकाणे हवाई मार्गाने परस्परांना जोडण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिमलामध्ये गुरुवारी उडान योजनेचा शुभारंभ झाला. ‘उडान’च्या माध्यमातून हवाई चप्पल घालणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना हवाई प्रवास शक्य व्हावा हेच आमचे ध्येय असल्याचे मोदींनी सांगितले. तरुणांना संधी दिली तर ते देशाचे चित्र आणि भविष्य बदलू शकतात. हवाई वाहतूक कंपन्यांना सर्वाधिक संधी भारतात असल्याचे त्यांनी सांगितले. हवाई यात्रा हा पूर्वी राजा- महाराजांचा विषय मानला जायचा. एअर इंडियाचा लोगोही ‘महाराजा’ होता. अटलबिहारी वाजपेयींचे सरकार असताना मी तत्कालीन केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रुडी यांना या महाराजाऐवजी कॉमन मॅनचे चित्र का नाही लावत असे सांगितले होते अशी आठवण त्यांनी याप्रसंगी सांगितली. आपण टॅक्सीने प्रवास केल्यास प्रतिकिलोमीटर ८ ते १० रुपये खर्च येतो. टॅक्सीने शिमलाला जाण्यासाठी १० तास लागतात. पण आता उडानमुळे हवाई प्रवास यापेक्षा कमी दरात करणे शक्य होईल असे त्यांनी सांगितले.

मला ईशान्य भारतात जायला आवडते. पण दळणवळणाची सुविधा अपूरी असल्याने मला तिथे जाणे शक्य होत नाही. पण आता उडानमुळे दोन शहर नव्हे तर संस्कृतीदेखील जोडली जाईल. ही योजना देशाला समर्पित करताना अभिमान वाटत असल्याचे मोदी म्हणालेत.

क्षेत्रीय हवाई जाळे विस्तारण्यासाठी केंद्र सरकारने ‘उडान’ प्रोत्साहनपूरक योजनेसाठी १२८ मार्ग निश्चित केले आहेत. पाच निवडक कंपन्या या मार्गावर आपली स्वस्तातील हवाई प्रवासी सेवा देतील. क्षेत्रीय विमान सेवा जाळे विस्तारण्याच्या दृष्टीने अशा सेवांकरिता ५० टक्के आसने ही प्रति तास २,५०० रुपये अशी किमान दराने आकारण्याचे बंधन आहे. भटिंडा, पुडुचेरी, सिमला, नांदेड अशी ७० विमानतळे याद्वारे जोडली जाणार आहेत. विविध २० राज्यांमधून ही सेवा सुरू होईल.