पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आपण मुदतीपूर्वी निवृत्ती स्वीकारत आहोत, हा राजीनामापत्रातील उल्लेख टाळावा, असा आग्रह पंतप्रधानांच्या कार्यालयातून धरण्यात आल्याने आपला राजीनामा फेटाळण्यात आला, असा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र सचिव सुजातासिंह यांनी शनिवारी केला.
नरेंद्र मोदी यांना परराष्ट्र सचिवपदी एस. जयशंकर यांची नियुक्ती करण्याची इच्छा आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला २८ जानेवारी रोजी दुपारी सांगितले. आपली मुदतीपूर्वी निवृत्ती स्वीकारण्याची इच्छा असल्याचे पत्र त्याच दिवशी पाठविले आणि त्यामध्ये पंतप्रधानांच्या सूचनेनुसार असा उल्लेख केला. मात्र पंतप्रधानांच्या कार्यालयातून आपल्याला दूरध्वनी करण्यात आला आणि तो संदर्भ वगळण्यास सांगण्यात आले. मात्र आपण त्याला स्पष्ट नकार दिला, असे सुजातासिंह म्हणाल्या.
पंतप्रधानांच्या सूचनेनुसार आपण इच्छा व्यक्त केली आणि उत्तम नागरी सेवक या नात्याने त्यांच्या सूचनांचे पालन केले, असे सुजातासिंह यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. सरकारमधीलच कोणीतरी आपल्याविरुद्ध उलटसुलट माहिती माध्यमांना देत आहे, पत्रकारांना गोपनीय माहिती पुरविण्यात आपल्याला रस नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. आपल्यासाठी हे प्रकरण संपले आहे, बागकाम आणि विणकाम हे  छंद यापुढे जोपासणार असल्याचे स्पष्ट करून सुजातासिंह यांनी यापुढील रूपरेषा गुलदस्त्यातच ठेवली.