पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यात राजकीय मतभेद असले तरी त्यांनी नेहमीच मला मानसन्मान दिला, असे सांगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मोदींचे कौतुक केले. आघाडी सरकारपेक्षा बहुमताचे सरकार कधीही चांगले असेही त्यांनी म्हटले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून, राष्ट्रपतीपदावरुन पायउतार झाल्यावर मुखर्जींची ही पहिलीच मुलाखत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), नोटाबंदी अशा विविध विषयांवर भाष्य केले. नरेंद्र मोदींशी माझे चांगले संबंध होते. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी त्यांनी नेहमीच माझा मान राखला, असे त्यांनी सांगितले.
नोटाबंदी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारला काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी धारेवर धरले होते. प्रणव मुखर्जींना नोटांबदी आणि जीएसटीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी राष्ट्रपतीपदावर असताना जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या निर्णयाचा विरोध कसा करु शकतो.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीविषयीही प्रणव मुखर्जींनी भाष्य केले. माध्यमांनी काँग्रेसकडे दुर्लक्ष करु नये, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा रिमोट कंट्रोल सोनिया गांधींकडे होता, असा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातो. मात्र मुखर्जींनी या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले.

प्रणव मुखर्जी आणि नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली आहेत. यापूर्वी मोदींनी मुखर्जींना ‘ज्ञानसागर’ म्हटले होते, तर मोदींच्या कार्यक्षमतेचे मुखर्जींनीही तोंडभरून कौतुक केले होते. मोदींनी मुखर्जी यांना राष्ट्रपती भवनातील शेवटच्या दिवशी ‘स्पेशल गिफ्ट’ दिले होते. मोदींनी मुखर्जींना एक पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी प्रणवदांचे भरभरुन कौतुक केले. मोदींचे हे स्पेशल गिफ्ट बघून प्रणव मुखर्जींही भावूक झाले होते.