भाजपसाठी व्होटबँकेचे राजकारण आणि निवडणुकीतील विजयापेक्षा देशाचा विकास महत्त्वाचा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत असा पुनरुच्चार त्यांनी केला.

दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शाहंशाहपूर येथे शेतकऱ्यांना संबोधित केले. सभेपूर्वी त्यांनी पशू आरोग्य मेळाव्यालाही भेट दिली. शेतकऱ्यांना संबोधित करताना मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. पशूधन आरोग्य मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो. शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात दुध विक्रीतून मिळणारा नफा महत्त्वाचा असतो असेही त्यांनी सांगितले. मात्र दुर्दैवाने यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. पशू आम्हाला मत देत नाही, मात्र तरीदेखील आम्ही त्यांचे सेवा करतो असे मोदींनी नमूद केले.

भाजपसाठी व्होटबँकेच्या राजकारणापेक्षा देशाचा विकास महत्त्वाचा आहे. पक्षापेक्षा आम्ही देशाला प्राधान्य देतो असे सांगत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. स्वच्छतेवरही मोदींनी भाष्य केले आहे. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक असते. बहुसंख्य आजारांचे कारण अस्वच्छता असते. युनिसेफच्या दाव्यानुसार घरात शौचालय असेल तर वर्षभरात आजारपणावर खर्च होणारे ५० हजार रुपये वाचतील. आता ग्रामीण भागात शौचालयांसाठी मोहीम सुरु झाली असून हे चित्र दिलासादायक आहे. स्वच्छता हा स्वभाव झाला असून स्वच्छतेची जबाबदारी सर्वांचीच आहे असेही त्यांनी सांगितले. देशात आजही अनेकांकडे हक्काचे घर नाही. अशा लोकांना २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असा पुनरुच्चार त्यांनी केला.

मार्चमध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीतील विजयानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मतदार संघात आले आहेत. त्यांनी या दौऱ्यात उत्तर प्रदेशला विकासकामांसाठी १ हजार कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले.