जम्मू आणि काश्मीरमध्ये जेव्हा शांतता असते तेव्हा देशाला फायदा होतो आणि हिंसा होते तेव्हा पाकिस्तानला फायदा होतो. त्यामुळे पाकचं काम सोपं करण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहेत असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली असतानाही राहुल गांधी आज सहारनपूरमध्ये दाखल झाले. पण जातीय हिंसाचार उसळलेल्या सहारनपूरच्या शब्बीरपूर गावात त्यांना जाऊ दिलेलं नाही. पोलिसांकडून रोखण्यात आल्यानंतर राहुल यांनी सहारनपूरमध्येच ठाण मांडून पंचायत बोलावली. यात राहुल यांनी माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली.

जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणली होती. पण आज दहशतवादाच्या आगीत जम्मू-काश्मीर जळतोय. जम्मू-काश्मीरमध्ये देशद्रोही शक्तींना पाय रोवण्यास मोदी मदत करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

शब्बीरपूरातील हिंसेला सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. उत्तरप्रदेशात कायदा-सुवव्यवस्था राखण्यास सरकारला अपयश आले आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात आज भीती आहे. देश चालवण्याची ही पद्धत नव्हे, असे राहुल म्हणाले. देशात आज गरीब आणि दुबळ्या लोकांसाठी जागाच उरलेली नाही. दलितांना दाबले जात आहे. हे संपूर्ण देशभरात होत असल्याचंही राहुल यांनी सांगितलं.

शब्बीरपूर येथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी निघालो होतो. पण मला रोखण्यात आलं. खरंतर मला उत्तरप्रदेशच्या सीमेवरच रोखलं जात होतं. तरीही मी इथवर पोहोचलो. येथील प्रशासनानं मला रोखलं आहे. त्यामुळे मी परत जातोय, पण जशी इथली परिस्थितीत नियंत्रणात येईल तसं मला ते गावात जाऊ देतील, अशी माहिती यावेळी राहुल गांधी यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हिंसाचाराच्या घटनेला मायावती जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर बहुजन समाज पक्षानेही पलटवार केला होता. जातीय हिंसाचार आणि त्यात झालेल्या जीवित आणि वित्तहानीला भाजप जबाबदार आहे, असा आरोप पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केला.