अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या आणि गारपीटग्रस्त शेतकऱयांना जास्तीत जास्त मदतीचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी मुद्रा बँकेचे अनावरण केले. यावेळी बोलताना मोदींनी गारपीटग्रस्त शेतकऱयांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना दिलेल्या कर्जाची पुर्नरचना करण्याचे बँकांना सुचवले. तसेच विमा कंपन्यांनाही पुढाकार घेऊन शेतकऱयांच्या  मागण्यांची पुर्तता करण्यास सांगितले. विशेष म्हणजे, शेतकऱयांना बँकेकडून मिळाणाऱया मदतीत आता वाढ करण्यात आली असून दुष्काळग्रस्त शेतकऱयाला मिळणाऱया भरपाईत दीडपटीने वाढ करण्यात आल्याची घोषणा मोदींनी याेवळी केली. याशिवाय ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले शेतकरी भरपाईसाठी पात्र आसतील, पूर्वी ही मर्यादा ५० टक्के होती.
२० हजार कोटींचे भांडवल असलेल्या मुद्रा बँकेच्या उदघाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले. या बँकेतून लघु उद्योजकांना १० लाख रुपयांपर्यंतचा पतपुरवठा होऊ शकेल तसेच ही बँक लघु वित्तपुरवठा संस्थांवर देखरेखीचेही काम करेल. या बँकेच्या माध्यमातून देशातील शेतकऱयाला मोठ्या प्रमाणावर मदत होणार असल्याचे मोदींनी सांगितले.
लघु वित्तपुरवठा संस्थांसाठी धोरण ठरवणे, त्यांची नोंदणी प्रमाणीकरण करणे तसेच मानांकन करणे ही या बँकेची प्रमुख कामे असतील. देशात सुमारे ५.७७ कोटी लघु उद्योजक आहेत. त्यांच्या नियमनाची जबाबदारी मुद्रा बँकेवर असेल. या बँकेच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावणे आणि विकासाला गती देणे हे उद्दिष्ट आहे, असे अर्थ खात्याने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.