नोटाबंदी आणि जीएसटी लागू करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे अपयशी निर्णय आहेत, ही टीका ‘द इकॉनॉमिस्ट’ने केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला जेवढे सुधारमतवादी दर्शवतात तेवढे ते नाहीत असाही उल्लेख याच अंकात करण्यात आला आहे. भारतात १ जुलैपासून GST लागू होतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘द इकॉनॉमिस्ट’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर आणि निर्णयांवर तोंडसुख घेतले आहे. द इकॉनॉमिस्ट हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यावसायिक मॅगझीन आहे. या मॅगझीनने भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना जो लेख लिहीला आहे त्यात ही टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा भारतातल्या व्यापाराला आणि विकासाला खीळ घालणारा आहे, तसेच जीएसटी लागू करण्याचा निर्णय हा लालफितीत अडकलेला कायदा आणि अकारण जटिल आहे, असाही उल्लेख या लेखात करण्यात आला आहे. नोटाबंदीमुळे जेवढा त्रास व्यापाऱ्यांना झाला तेवढा काळा पैसा असणाऱ्यांना अजिबात झाला नाही. मागील तीन वर्षात मोदींनी विकासाचा आलेख उंचावण्याच्या बढाया मारल्या, मात्र त्यांना काही अर्थ नाही. गेल्या तीन वर्षांचा कार्यकाळ पाहिला तर, नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. तसेच एनडीव्हीचे प्रणय रॉय यांच्या घरांवर टाकण्यात आलेले छापे म्हणजे तपास यंत्रणा आणि सीबीआयची दादागिरी दाखवणारे ठरले आहेत, असाही उल्लेख या लेखात करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुधारमतवादी वाटण्याऐवजी ‘अंध राष्ट्रवादी’ वाटत आहेत, ‘स्तुतीप्रिय व्यक्ती पूजे’च्या केंद्रस्थानी ते बसले आहेत, अशी टीकाही द इकॉनॉमधील लेखात करण्यात आली आहे. २०१९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी ‘व्यक्ती पूजा’ हे नवे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवू शकतात अशी शक्यता आहे, असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जे निर्णय घेत आहेत, त्यावरुन ते चुकीच्या दिशेने जात आहेत असे दिसते आहे. असाही उल्लेख या लेखात करण्यात आला आहे.

द इकॉनॉमिस्टने आपल्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका वाघाच्या पाठीवर स्वार झाले आहेत, असे दाखविण्यात आले आहे. हा वाघ खरा नसून कागदी वाघ आहे. तो एका तलावावरून उडी मारतो आहे, त्यात हा कागदी वाघ उडी मारताना फाटला आहे असेही दाखविण्यात आले आहे. तसेच ‘भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती’ असे उपरोधिक संदेशही या फोटोखाली लिहीण्यात आला आहे.