पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना

भ्रष्टाचार, दारिद्रय़ व निरक्षरता ही देशापुढील आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी पुढील पाच वर्षांत विशेष प्रयत्न करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. त्यासाठी करेंगे व और कर के रहेंगे ही प्रतिज्ञा घ्यावी अशी सूचना त्यांनी व्यक्त केली.

छोडो भारत चळवळीच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त लोकसभेत पंतप्रधान बोलत होते.  भ्रष्टाचारामुळे देशाच्या विकासावर परिणाम होत असल्याचा इशारा त्यांनी दिला. १९४२ मध्ये करेंगे या मरेंगे हा नारा देण्यात आला, आता पुढील पाच वर्षांत करेंगे और करे के रहेंगे यावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्त सकारात्मक बदल घडवून इतर देशांसाठी आपण प्रेरणादायी बनू अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. स्वातंत्र्य चळवळीत महिलांच्या योगदानाचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला. छोडो भारत चळवळीत महात्मा गांधी यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्या वेळी गांधीजी कारागृहात असताना, नव्या नेतृत्वाने पोकळी भरून काढली असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी तीस मिनिटांच्या भाषणात विविध नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीत केलेल्या योगदानाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. यात त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, चंद्रशेखर आझाद तसेच राजगुरू यांच्या कार्याचा पंतप्रधानांनी गौरव केला. गांधीजींनी अहिंसेचा मार्ग कधीही सोडला नाही याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

थोर नेत्यांच्या विचारातील देश घडवू

नवी दिल्ली : लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे, सौहार्द व देशभक्ती वाढीस लावणे तसेच देश भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याबाबतचा ठराव लोकसभेत करण्यात आला. भारत छोडो चळवळीला ७५ वर्षे झाल्यानिमित्त हा ठराव घेण्यात आला. यात पुढील पाच वर्षांत अविश्रांतपणे काम करून महात्मा गांधी व इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या संकल्पनेतील देश घडवू असे वचन ठरावात देण्यात आले आहे. आम्ही सव्वाशे कोटी जनतेचे प्रतिनिधी नागरिकांना बरोबर घेऊन स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारातील देश घडवू असे ठरावात स्पष्ट करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ठरावाचे वाचन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसेच इतर नेत्यांच्या भाषणानंतर हा ठराव घेण्यात आला.

लोकशाही संपविण्याचा काही शक्तींचा कट! लोकसभेत सोनियांचे टीकास्त्र

नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काही संघटनांचा सहभाग नव्हता. इतकेत नव्हे तर काहींनी विरोधही केला अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेतील चर्चेत नाव न घेता संघ परिवारावर टीकास्त्र सोडले. हीच मंडळी लोकशाही संपवू पाहात आहेत असा आरोप सोनियांनी छोडो भारत आंदोलनाच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेतील चर्चेत फुटीरतावादी राजकारणात प्रभावी होऊ पाहात असल्याची भीती व्यक्त केली.

धर्मनिरपेक्ष, लोकशाही व उदारमतवादी प्रवाहांना दडपले जात असून, चर्चेला वेगळे मत व्यक्त करण्यास स्थान नसल्याची खंत सोनियांनी व्यक्त केली. भाषणात सोनियांनी संघाचा उल्लेख केला नाही, मात्र त्यांचा रोख त्यावर होता. छोडो भारत चळवळीला काही जणांनी विरोध केला होता अशी टीका सोनियांनी केली.

त्या वेळी सत्तारूढ बाकांवरून किरण खेर यांनी घोषणा दिल्या, मात्र ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या. संकुचित विचारांचा देश आम्ही होऊ देत नाही. अशा शक्तींना पराभूत करावेच लागेल असे सोनियांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्ष व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान सोनियांनी अधोरेखित केले.