पंतप्रधानांचे आवाहन; प्रथा निर्मूलनासाठी मुस्लिमच पुढाकार घेण्याचा विश्वास

‘तिहेरी तलाक’च्या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका, असे आवाहन मुस्लिम समाजाला करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच समाजातील विचारवंत मंडळी या प्रथेच्या निर्मूलनासाठी पुढे येतील, असा विश्वास शनिवारी व्यक्त केला. बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

बाराव्या शतकात अनिष्ठ प्रथांविरोधात बसवेश्वर यांनी केलेल्या सुधारणा चळवळीचा संदर्भ देत मोदी यांनी ‘तिहेरी तलाक’च्या पुन्हा लक्ष वेधले. ‘‘तिहेरी तलाकच्या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका. पुढे या आणि त्यावर तोडगा काढा. हा तोडगा उत्तमच असेल आणि पुढील अनेक पिढय़ा त्याबद्दल तुमची आठवण काढतील, असे मोदी म्हणाले.

‘‘समाजातूनच काही शक्तीशाली लोक पुढे येतील आणि कालबाह्य़ झालेल्या या प्रथेचे         उच्चाटन करतील. आमच्या मुस्लीम भगिनी आणि मातांची तिहेरी तलाकच्या तडाख्यातून सुटका करण्याची जबाबदारी समाजातील विचारवंत स्वीकारतील याची आपल्याला खात्री आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतातील मुस्लिमांनी केवळ देशातील मुस्लिमांनाच नव्हे तर जगातील मुस्लिमांना आधुनिकतेचा मार्ग दाखवावा, असे आवाहनही मोदी यांनी केले.

मोदी यांनी या वेळी महिला सक्षमीकरण, समानता आणि उत्तम कारभार याबाबत बसवेश्वर यांच्या शिकवणीचा संदर्भ दिला. मोदी यांनी बसवेश्वर यांच्या ‘वचन’ या डिजीटल ग्रथांचे अनावरण केले. ते २३ भाषांत उलब्ध असून, त्यात बसवेश्वर यांच्या २५०० प्रवचनांचा समावेश आहे.

नरेंद्र मोदी यांनी या वेळी ‘सबका साथ, सबका विकास’ या सूत्राचा पुनरूच्चार केला. ‘‘सर्व लोकांना कोणत्याही भेदभावाशिवाय घरे, वीज मिळायली हवी. शेतकऱ्यांना कोणत्याही भेदभावाशिवाय खत मिळाले पाहिजे. ‘सबका साथ, सबका विकास’ हेच तर आहे, असे मोदी म्हणाले.

वासनातृप्तीसाठी तलाकचा गैरवापर : स्वामीप्रसाद मौर्य

बस्ती (उत्तर प्रदेश) : मुस्लीम पुरूष वासनातृप्तीसाठी तलाकचा गैवापर करतात, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशचे मंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांनी केला आहे. तिहेरी तलाकचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असताना मौर्य यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिहेरी तलाकला कोणताही आधार नसल्याचे मौर्य यांनी म्हटले आहे. ”एखाद्याने वासनातृप्तीसाठी पत्नी बदलली आणि स्वत:च्या पत्नी आणि मुलांना रस्त्यावर सोडून दिले तर ती बाब योग्य आहे असे कोणीही म्हणणार नाही. ज्या मुस्लीम महिलांना विनाकारण तलाक दिला जातो त्यांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभा आहे, असे मौर्य म्हणाले.