पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वेचे खासगीकरण करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच रेल्वे क्षेत्रात परकीय गुंतवणुकीवरून रेल्वे युनियनने कसलीही चिंता करण्याची गरज नसल्याचेही मोदींनी म्हटले आहे. रेल्वेच्या खासगीकरणाला रेल्वे युनियन्सकडून विरोध सुरू असतानाच रेल्वेच्या खासगीकरणाबाबत मोदींचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे. वाराणसीतील रेल्वे वर्कशॉपच्या विस्तारीकरणाच्या कामाचा मोदींच्या हस्ते गुरूवारी शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलते होते.
मोदी म्हणाले की, रेल्वे आणि माझे जवळचे नाते आहे. माझे आयुष्यच रेल्वेतून घडले आहे. रेल्वेच्या खासगीकरणाच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. रेल्वेचे खासगीकरण होणार असल्याचा गैरसमज पसरविला जात आहे. रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नाही हे आज मी स्पष्ट करु इच्छितो. रेल्वेच्या विकासासाठी जगभरातून पैसा आणायचा आहे आणि त्यामाध्यमातून देशाचा विकास घडवायचा आहे. कारण, देशाच्या विकासात रेल्वेचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे रेल्वेच्या विकासासाठी डॉलर येवो किंवा रुपये येवोत. यातून काय फरक पडतो, उलट तुमचा विकास होणार आहे, असेही मोदी यांनी यावेळी नमूद केले. देशाच्या चारही भागांमध्ये रेल्वे विद्यापीठांची स्थापना करण्याचा मानस असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. रेल्वे आणि पोस्ट ऑफीस यांचे जाळे देशाच्या कानाकोपऱयात पोहोचले पाहिजे, असेही मत मोदींनी व्यक्त केले