नरेंद्र मोदींचे सततचे परदेश दौरे अनेकांच्या टीकेचा विषय असला तरी या दौऱ्यांतील एक सकारात्मक गोष्ट नुकतीच उजेडात आली आहे. परदेश दौऱ्यातील व्यस्त वेळापत्रकामुळे मोदी वेळ वाचवण्यासाठी विमानातच झोप पूर्ण करतात. त्यामुळे विमानातून उतरल्यानंतर त्यांना झपाट्याने दौरे करून राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करणे, करारांवर स्वाक्षऱ्या करणे आदी कामे लवकरात लवकर आटपणे शक्य होते.
त्यासाठीच रात्री विमानप्रवास करून ते प्रवासादरम्यानच आपली झोप पूर्ण करतात. बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना मोदींनी मुद्दाम रात्रीच्या वेळी विमान प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ‘एअर इंडिया’च्या फ्लाईटने संपूर्ण जगभर प्रवास करणा-या पंतप्रधान मोदींच्या चेक-इन बॅग्ज या दौऱ्यांदरम्यान विमानाच्या बाहेर येताना दिसत नव्हत्या.
पंतप्रधान मोदी नुकतेच, बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौ-यावर गेले होते. या दौ-यादरम्यान मोदींनी तीन रात्री विमानातूनच प्रवास केला, तर दिवसभरात त्यांनी या देशांना भेटी देऊन आपली कामे पूर्ण करण्यावर भर दिला. दिल्ली ते ब्रसेल्स ( बेल्जियम), ब्रसेल्स ते वॉशिंग्टन डी.सी आणि तेथून रियाधला जाण्यासाठी त्यांनी रात्रीच प्रवास करण्यास प्राधान्य दिले.
एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी केवळ २ रात्री, वॉशिंग्टन व रियाध येथे हॉटेलमध्ये मुक्काम केला. ‘ केवळ ९७ तासांमध्ये मोदींनी अमेरिकेसह विविध देशांचा दौरा केला. जर त्यांनी रात्री विमान प्रवास करण्याचा निर्णय घेतला नसता तर याच दौ-यासाठी आम्हाला कमीत कमी ६ दिवस तरी लागले असते’ असे अधिका-याने नमूद केले. मात्र, मोदींच्या निर्णयामुळे हा दौरा केवळ चार दिवसांत पूर्ण झाला. हॉटेलचा मुक्काम कमी झाल्यामुळे दौऱ्यावरील खर्चातही बचत झाल्याचे या अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले.