पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे शनिवारी हार्ट ऑफ एशिया परिषदेत सहभागी होण्यासाठी अमृतसरमध्ये दाखल झाले. सर्वात प्रथम या नेत्यांनी शिख समुदायासाठी पवित्र असलेल्या सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पंतप्रधान मोदी यांनी फक्त दर्शनच घेतले नाही तर तेथील लंगरमध्ये जाऊन भाविकांची सेवा ही केली. त्यांनी उपस्थित भविकांना जेवण वाढले. कोणताही प्रोटोकॉल न पाळता त्यांनी लंगरमध्ये आपली सेवा बजावली.
या वेळी मंदिरावर विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. प्रारंभी पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष घनी यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. दोघांनी मंदिराची पाहणी केली. यावेळी दोन्ही देशांचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

या वेळी त्यांच्याबरेाबर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर, पंजाबचे उपमुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष घनी यांनी मंदिराच्या नोंदवहीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
या परिषदेत प्रामुख्याने दहशतवाद, जहालमतवादाविरोधातील उपाय, शिक्षणाच्या क्षेत्रातील सहकार्य वाढवणे यावर चर्चा केली जाणार आहे. या परिषदेत भारत, पाकिस्तान, चीन, इराण, रशिया, सौदी अरेबिया, अझरबैजानसह १४ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर १७ सहयोगी देशांचे प्रतिनिधीही सामील होतील. एकूण सुमारे ४० देश आणि युरोपीय देशाचे प्रतिनिधीनींही हा परिषद खूप महत्वाचे असल्याचे जाहीर केले आहे.

या परिषदेमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सहभागी आहेत. पाकिस्तानकडून पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वतीने सरताज अजीज सहभागी झाले आहेत. दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावाच्या पार्शवभूमीवर द्विपक्षीय संबंधांमधील कोंडी फुटणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. गेली परिषद पाकिस्तानात झाली होती. त्यावेळी स्वराज आणि अजीज यांच्यामध्ये चर्चा झाली होती.