जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. शिंजो आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’च्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे. अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प १.८ लाख कोटींचा असणार आहे. हा प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित होते.

बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी जपानकडून करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल मोदींनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे आभार मानले. बुलेट ट्रेनमुळे विकासाचा वेग वाढेल, असे मोदींनी म्हटले. ‘बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचे संपूर्ण श्रेय शिंजो आबे यांना जाते. भारतीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असून अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले आहे,’ असे मोदी म्हणाले.

जपान आणि भारताचे संबंध अतिशय दृढ असल्याचे म्हणत मोदींनी बुलेट ट्रेनची गरजदेखील अधोरेखित केली. ‘बुलेट ट्रेन सोयीची असून ती सुरक्षितही आहे. कोणत्याही देशाच्या विकासात तेथील वाहतुकीच्या साधनांचा मोठा वाटा असतो. वाहतूक व्यवस्थेचे देशाच्या विकासात मोठे योगदान असते. अमेरिकेतील विविध भागांमध्ये रेल्वेमार्ग पोहोचल्यावर समृद्धी आली, हा इतिहास आहे आणि हाय स्पीड रेल्वेमुळे युरोपपासून चीनपर्यंत आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन झाले, हे वर्तमान आहे,’ असे मोदींनी म्हटले.

या कार्यक्रमावेळी बोलताना शिंजो आबे यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन केले. ‘१० वर्षांपूर्वी मला भारताच्या संसदेला संबोधित करण्याची संधी मिळाली होती. जपान आणि भारताचे संबंध म्हणजे हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराचा संगम आहेत. माझे मित्र पंतप्रधान मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते असून बुलेट ट्रेनचे स्वप्न करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जपान आणि भारताचे अभियंते दिवस-रात्र मेहनत करतील. या अभियंत्यांनी निश्चय केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही,’ असे आबे यांनी म्हटले.

हाय स्पीड ट्रेनमुळे जपानच्या अर्थव्यवस्थेची भरभराट झाल्याचेही आबे यांनी म्हटले. ‘१९६४ मध्ये जपामध्ये हाय स्पीड रेल्वे सेवा सुरु झाली. यामुळे जपानची अर्थव्यवस्था आणि लोकांची भरभराट झाली. लोकांच्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी झाले. जपानमधील बुलेट ट्रेन सेवा अतिशय सुरक्षित आहे. ही सेवा सुरु झाल्यापासून अद्यापपर्यंत एकही अपघात झालेला नाही,’ असेही त्यांनी म्हटले. शक्तीशाली भारत जपानच्या पाठिशी असून शक्तीशाली जपानदेखील भारताच्या पाठिशी आहे असे म्हणत पुढील वेळी मोदींसोबत बुलेट ट्रेनमधून येईन, असेही आबे म्हणाले.