तापमानवाढीची समस्या विकसित देशांची; मात्र भारतावर परिणाम
जागतिक हवामान बदल आणि तापमानवाढीची समस्या विकसित देशांनी निर्माण केली असूनही भारतासारखे विकसनशील देश त्याचे परिणाम भोगत आहेत. त्याची जबाबदारी आमच्यावर न टाकता सर्व देश ज्या प्रमाणात प्रदूषण करीत आहेत, त्या प्रमाणात जबाबदारी वाटून घेतली पाहिजे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस येथील जागतिक हवामानविषयक परिषदेत लगावला.
पॅरिस येथील हवामानविषयक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, हवामान बदल हे जागतिक आव्हान आहे. तापमानवाढीवर र्सवकष, समन्यायी आणि शाश्वत तोडगा काढण्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज आहे. परिषदेतील भारतीय दालनाचे उद्घाटन करताना मोदी म्हणाले, जागतिक हवामान बदल ही गंभीर समस्या आहे. पण विकसित देशांनी त्यांची प्रगती साधताना केलेले औद्योगिकीकरण आणि जीवाष्म इंधनांचा वापर यामुळे ही समस्या उद्भवली आहे. त्याची पूर्ण जबाबदारी विकसनशील देशांवर टाकणे चुकीचे आहे. प्रत्येक देशाकडून होणाऱ्या कार्बन वायू उत्सर्जनाच्या प्रमाणानुसार जबाबदारीही वाटून घेतली पाहिजे.
यावेळी भारताची पर्यावरण रक्षण करण्यासाठी असलेली कटिबद्धता प्रकट होत असल्याचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

मोदी- शरीफ भेट
पाकिस्तानकडून सीमेवर वारंवार केल्या जाणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले असूनही पॅरिस येथील परिषदेत समोरासमोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करून जुजबी बोलणे केले.
*****
दोन्ही नेत्यांत नेमके काय बोलणे झाले समजले नसले तरी त्यातून उभय देशांचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परिषद उद्घाटन :
पॅरिस येथे सोमवारपासून जागतिक हवामानविषयक शिखर परिषदेला सुरुवात झाली. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेंट फेबियस यांनी परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारताना म्हटले की, हवामानविषयक समस्यांवर तोडगा आवाक्यात असल्याचे दिसत आहे. संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या आणि बारा दिवस चालणाऱ्या या परिषदेला १५० देशांचे प्रमुख उपस्थित आहेत.