पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येत्या ३ नोव्हेंबरला दिल्लीतील ११ अशोका रोडवरील भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. या दिवाळी मिलन कार्यक्रमात सुमारे २५०० हून अधिक पत्रकारांना बोलावण्यात येणार आहे. यामध्ये मुद्रित माध्यम, टीव्ही आणि वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले जाणार आहे. कार्यक्रमासाठी विशेष सुरक्षा दलाने तयारीही सुरू केली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे प्रत्येकांशी वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहेत. कारण २०१४ मध्ये झालेल्या अशाच एका कार्यक्रमात पत्रकारांनी मोदींबरोबर सेल्फी घेताना एकमेकांना धक्काबुक्की केली होती.
गतवर्षी २८ नोव्हेंबर रोजी ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींबरोबर अनेक कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. त्यावेळी मोदींनी हा कार्यक्रम दिवाळी नंतर आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच यंदा दिवाळी नंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतात साजरा केले जाणारे सण हे समाजाला नवी प्रेरणा देतात. दिवाळीही हा असाच एक सण असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते. या कार्यक्रमावेळी अनेक दिग्गज पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांबरोबर सेल्फीमुळे #ModiMediaGate ट्रेंड सुरू झाला होता. यंदा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनीही दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.