पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा या दोघांची बहुचर्चित भेट २९ आणि ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. उभय राष्ट्रांमधील संबंध सुधारणे, परस्परांचे राष्ट्रीय हितसंबंध लक्षात घेत सामरिक करार करणे आदी बाबींवर या भेटीत भर दिला जाणार आहे. उभय नेत्यांनी भेटीसाठी दोन दिवस राखून ठेवले आहेत, यातूनच या भेटीचे महत्त्व लक्षात येऊ शकले, अशी प्रतिक्रिया व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सन २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलींच्या पाश्र्वभूमीवर २००५ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. त्यातच २०१३ मध्ये भारताच्या राज्यसभेतील काही खासदारांनी मोदी यांना व्हिसा दिला जाऊ नये, अशी विनंती करणारे पत्रच अध्यक्ष बराक ओबामा यांना धाडले होते. या पाश्र्वभूमीवर भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जॉन केरी यांनी भारतातील सत्ताबदलानंतर पंतप्रधानांची आणि भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेत उभयतांना अमेरिका भेटीचे आमंत्रण दिले होते. तसेच खुद्द बराक ओबामा यांनीही पंतप्रधानांनी फोनद्वारे अमेरिका भेटीचे आमंत्रण देत या प्रश्नास पूर्णविराम दिला होता. सोमवारी व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी अध्यक्ष ओबामा आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या तारखा जाहीर केल्या. येत्या २९ आणि ३० तारखेला व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटतील, अशी माहिती व्हाईट हाऊसमधील प्रसिद्धी माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी दिली.
या भेटीचा तपशीलवार कार्यक्रम अद्यापही जाहीर झाललेला नाही. अर्थव्यवस्थेस बळकटी, संरक्षणविषयक सहकार्य, सामरिक संबंध आदींवर या भेटीत चर्चा करण्यात येईल, असे अर्नेस्ट यांनी स्पष्ट केले.