आधार कार्ड प्रकल्पात किती प्रमाणात प्रगती झाली, याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, ६ सप्टेंबर रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
 केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या ‘जन-धन योजने’सह इतर कल्याणकारी योजनांमध्ये महत्त्वाचे साधन म्हणून आधार कार्डचा वापर करण्याचा उद्देश आहे. या बैठकीत उच्च अधिकारी सहभागी होतील. या वेळी प्रकल्पातील प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. विशेषत: उत्तर प्रदेश आणि बिहारमधील केंद्राच्या इतर योजनांची अंमलबजावणी अत्यंत धीम्या गतीने होत असून आधार कार्डसाठी नोंदवण्यात आलेल्या अर्जाची संख्या कमी असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
सद्य:स्थितीत ६६ कोटी ६२ लाख नागरिकांना आधार कार्ड क्रमांक पुरवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात हा आकडा अत्यंत कमी आहे. राज्यातील १९ कोटी ९५ लाख लोकसंख्येपैकी केवळ चार कोटी ६२ लाख नागरिकांनाच आधार कार्ड क्रमांक पुरवण्यात आला आहे, तर बिहार राज्यात हीच संख्या १ कोटी ४१ लाख इतकी आहे. बिहारची लोकसंख्या १० कोटी ३८ लाख इतकी आहे. या बैठकीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह इतर कॅबिनेट सदस्य हजर राहतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. शक्य तितक्या लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्याचा केंद्राचा मानस आहे.