पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचा मुहूर्त ठरला आहे. २५ आणि २६ जूनरोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ते डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. पॅरिसच्या करारावरुन भारतावर केलेली टीका, एच१बी व्हिसा धोरणामुळे भारतीय आयटी कंपन्यांना बसलेला हादरा आणि पाकिस्तानच्या कुरापती यापार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी मोदींना अमेरिका दौऱ्याचे आमंत्रण दिले होते. मोदींनीदेखील हे आमंत्रण स्वीकारले होते. पण अमेरिका दौरा कधी करणार हे अद्याप स्पष्ट नव्हते. सोमवारी संध्याकाळी मोदींच्या बहुप्रतिक्षित अमेरिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले.

२५ आणि २६ जूनरोजी नरेंद्र मोदी अमेरिका दौरा करणार असून या दौऱ्यात वॉशिंग्टनमध्ये मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भेट होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करारातून बाहेर पडताना भारतावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ट्रम्प पहिल्यांदाच नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद आहेत. पण द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न दोन्ही नेते करतील अशी चर्चा आहे. दक्षिण आशिया चर्चेच्या केंद्रस्थानी असेल असे सूत्रांकडून समजते. भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव वाढला असून अणूपुरवठादार गटात प्रवेश मिळवण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहे. या सर्व विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. तसेच दोन्ही देशांमधील व्यापार, एच१बी व्हिसा यावरही चर्चा होईल असे सूत्रांनी सांगितले. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारत हा संरक्षण क्षेत्रात अमेरिकेचा जवळचा साथीदार असेल असे विधान केले आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे करार होतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.