पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली असून शनिवारी रात्री उशीरा मोदी अमेरिकेत पोहोचले. वॉशिंग्टनमध्ये मोदींचे स्वागत करण्यात आले असून मोदींसाठी विमानतळाबाहेर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनीदेखील गर्दी केली होती. तर मोदींचे आगमन होत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत खरा मित्र असल्याचे सांगत द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी चर्चा करु असे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणानुसार मोदी हे अमेरिकेला भेट देत असून ट्रम्प तसेच अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मोदी चर्चा करणार आहेत. शनिवारी रात्री मोदी पोर्तूगालवरुन अमेरिकेत दाखल झाले. वॉशिंग्टन विमानतळावर मोदींचे स्वागत झाले. विमानतळाबाहेर मोदींना बघण्यासाठी भारतीय वंशाच्या नागरिकांनी गर्दी केली होती. ‘मोदी मोदी’ असा जयघोष करत स्थानिकांनी भारताच्या पंतप्रधानांचे स्वागत केले.

मोदींच्या आगमनापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. ‘भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा उल्लेख ‘खरा मित्र’ असं करत धोरणात्मक विषयांवर चर्चा करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तर या दौऱ्यापूर्वी मोदी म्हणाले, भारत व अमेरिका यांच्यातील संबंधात या दौऱ्यामुळे प्रगती होईल.

मोदी उद्या ट्रम्प यांची भेट घेणार असून व्हाईट हाऊसमध्ये ते ट्रम्प यांच्यासोबत डिनर घेतील. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये डिनर घेणारे नरेंद्र मोदी हे जगातील पहिलेच नेते ठरणार आहेत. दहशतवाद, एच १ बी व्हिसाच्या नियमांमधील बदल असा विविध मुद्द्यांवर दोन्ही नेते चर्चा करतील. याशिवाय संरक्षणासंबंधी मुद्द्यांवरही चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेपूर्वी मोदी पोर्तुगाल दौऱ्यावर होते. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये ११ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच दहशतवादाविरोधात दोन्ही देश एकत्र असल्याची ग्वाही पोर्तुगालने दिली. अमेरिका दौऱ्यानंतर मोदी नेदरलँड्सला जाणार असून पंतप्रधान मार्क रूट व राजे विल्हेम अॅलेक्झांडर तसेच राणी मॅक्सिमा यांची ते भेट घेतील.