पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टाईम मासिकाच्या यंदाच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ या  किताबाचे मानकरी ठरले आहेत. टाईम मासिकाकडून सोमवारी ही घोषणा करण्यात आली. ‘पर्सन ऑफ द इयर’ ठरविण्यासाठी टाईम मासिकाने ऑनलाईन सर्वेक्षण घेतले होते. यामध्ये ऑनलाईन वाचकांनी नरेंद्र मोदी यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ ठरविले. ‘टाईम’ने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांना एकुण १८ टक्के मते मिळाली. येत्या ७ डिसेंबरला टाईम मासिकाकडून ‘पर्सन ऑफ द इयर’चा विजेता जाहीर केला जाईल. या ऑनलाईन सर्वेक्षणात मोदी यांच्याबरोबर बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि ज्युलिअन असांज हेदेखील स्पर्धेत होते. मात्र, या तिघांनाही प्रत्येकी ७ टक्के मते मिळाली. तर मार्क झुकरबर्ग याला दोन आणि हिलरी क्लिंटन यांना चार टक्के मते मिळाली.  देशातील काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी  चलन बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे सध्या मोदींच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली आहे. तर अमेरिकेतील निवडणुकीच्या दरम्यान ‘विकिलीक्स’ने अनेक कागदपत्रांचा खुलासा केल्यामुळे ज्युलियन असांज यांना लोकप्रियता मिळाली होती.

नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी २०१४मध्ये मोदींनी १६ टक्के मते मिळवत या पुरस्कारावर नाव कोरले होते. याशिवाय, मोदी गेली सलग चार वर्षे या पुरस्काराच्या स्पर्धेत राहिले आहेत. टाईम मासिकाकडून दरवर्षी जगातील परिस्थितीवर चांगल्या किंवा वाईट प्रकारे प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. मागील वर्षी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांना हा पुरस्कार मिळाला होता.