यूपीएच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक विकासाचा आणि अन्य विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ३० एप्रिल रोजी नियोजन आयोगाच्या सदस्यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नियोजन आयोगाचे अध्यक्ष असून, ही त्यांची समारोपाची बैठकच असणार आहे.
योजना भवन येथे होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान नियोजन आयोगाच्या सदस्यांचे आभार मानण्याचीही शक्यता आहे. गेल्या १० वर्षांत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोणती पावले उचलली, कोणते निर्णय घेण्यात आले, याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.
पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर किंवा पंतप्रधानपद सोडल्यानंतर नियोजन आयोगाचे सदस्यही बदलले जातात. जूनमध्ये नवे सरकार येणार असून, पंतप्रधानपदीही नवी व्यक्ती विराजमान होईल. त्यामुळे जूनपासून नियोजन आयोगाचे सदस्यही बदलतील. त्यामुळे पंतप्रधानांनी बोलावलेल्या या बैठकीत नियोजन आयोगाचे सर्व सदस्य आपले राजीनामे पंतप्रधानांकडे देतील, अशी आशा आहे.
या बैठकीला नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांच्यासह बी. के. चतुर्वेदी, सौमित्र चौधरी, सय्यद हमीद, नरेंद्र जाधव, अभिजीत सेन, मिहीर शहा, के. कस्तुरीरंगन, अरुण मीरा हे सदस्य आणि नियोजन खात्याचे राज्यमंत्री राजीव शुक्ला उपस्थित राहणार आहेत.