सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात सैन्यातील जवानांवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसाठी नवीन मोहीम सुरु केली आहे. दिवाळीनिमित्त जवानांना पत्र किंवा संदेश पाठवा असे आवाहन करण्यात येणार असून खुद्द मोदींनीच ही संकल्पना मांडली आहे. सैन्य आणि देशवासीयांमधील संवाद वाढावा यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात सैन्यातील जवानांविषयी आदर आणखी वाढला आहे. गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी यांनी नवी संकल्पना मांडली होती. यात जनतेने जवानांना पत्र किंवा मेसेजच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन केले आहे. यासंदर्भात नरेंद्र मोदींनी चार मिनीटांचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओत चिमूरड्यापासून ते तरुण आणि महिलांपर्यंत सर्व जण जवांना पत्र किंवा मेसेज करत असल्याचे दाखविले आहे. यातील निवडक संदेश हे नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातही वाचून दाखवतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही या संदर्भातील विशेष कार्यक्रम असतील. यामध्ये सेलिब्रिटीमंडळीदेखील सहभागी होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. नरेंद्र मोदी अॅप,  MyGoV अॅप आणि रेडिओच्या माध्यमातूनही जवानांना संदेश पाठवणे शक्य होणार आहे. देशातील सव्वाशे कोटी जनता जेव्हा सैन्यातील जवानांच्या पाठिशी उभी राहते तेव्हा त्या जवानांची ताकद सव्वाशे कोटींनी वाढते असेही मोदींनी म्हटले आहे.

भोपाळमधील जाहीर कार्यक्रमातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना मानवंदना द्या असे आवाहन केले होते. परदेशात जवान दिसल्यावर त्यांना मानवंदना देतात. तशीच पद्धत आपणही सुरु केली पाहिजे असे मोदींनी म्हटले होते. मोदींनी सुरक्षा दलावर भर दिल्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या दोन वर्षांपासून मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. तर मंत्रिमंडळातील महिला मंत्री या रक्षाबंधनच्या दिवशी जवानांना राखी पाठवतात.