भारताने सक्रिय भूमिका घेऊन लष्कराला म्यानमारच्या धर्तीवर नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांविरुद्ध कारवाई करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जम्मू- काश्मीरमधील एका भाजप आमदाराने केली आहे.
दहशतवाद्यांना आता इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी संघटना प्रशिक्षण देत असल्याची माहिती लष्कराचा गुप्तचर विभाग, रॉ व इतर गुप्तचर संस्थांनी अलीकडच्या दिवसांमध्ये दिली आहे. इस्लामिक स्टेटने याआधीच पाकव्याप्त काश्मीरमधील प्रशिक्षण शिबिरांमध्येही शिरकाव केला आहे. त्यामुळे म्यानमारप्रमाणेच भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून तेथील दहशतवादी जाळे उद्ध्वस्त करावे, असे भाजपचे सुंदरबनी येथील आमदार रवींदर रैना म्हणाले.
भारतीय सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशी कारवाई करण्यास सक्षम आहे, मात्र त्यासाठी सक्रिय भूमिका आवश्यक असल्याचे रैना म्हणाले.