देशद्रोहाच्या आरोपावरून तीन दिवसांची कोठडी
संसदेवरील हल्ला प्रकरणातील गुन्हेगार अफजल गुरू याच्या फाशीबाबत मंगळवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात निषेध कार्यक्रम घेऊन घोषणाबाजी केल्या प्रकरणी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याला शुक्रवारी देशद्रोह आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपावरून अटक झाली. दिल्ली न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. ‘विचारस्वातंत्र्याचा अर्थ अविचारस्वातंत्र्य असा नाही,’ या शब्दांत भाजप प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी या अटकेचे समर्थन केले. सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाबाबत ठरवून दिलेल्या निकषाचे उल्लंघन कारवाईत होऊ नये, अशी अपेक्षा काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी व्यक्त केली आहे.
भाजप खासदार महेश गिरी व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेल्या तक्रारीवरून त्याला अटक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या विद्यापीठात मंगळवारी एक कार्यक्रम घेऊन २०१३च्या संसद हल्ल्यातील गुन्हेगार अफ जल गुरू याच्या फाशीविरोधात घोषणाबाजी झाली होती. अभाविपने आक्षेप घेतल्याने प्रशासनाने या कार्यक्रमास परवानगी दिली नसताना हा प्रकार घडला. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी चौकशी समिती नेमली असून परवानगी नसताना हा कार्यक्रम कसा झाला, याची चौकशी करण्यात येत आहे.

कन्हैयाकडून इन्कार
देशाविरोधात मी घोषणा दिल्या नाहीत की त्यांचे मी कदापि समर्थन करणार नाही. अभाविप आणि माझ्या कार्यकर्त्यांत झटापट सुरू झाल्याने मी तिकडे धाव घेतली होती. मी एकही घोषणा दिली नाही. अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाल्याने वैफल्यग्रस्त अभाविपने आम्हाला अडकवले आहे.
– गिलानी विरोधात गुन्हा/विविधा
जर कुणी भारतविरोधी घोषणा देत असेल व देशाच्या एकात्मतेलाच आव्हान देत असेल तर गय केली जाणार नाही, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. संबंधितांवर शक्य तितकी कठोर कारवाई करावी असे आदेश दिल्ली पोलिसांना दिले.
– राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री.

अफजल गुरूच्या नावाखाली भारतमातेचा अपमान सहन केला जाणार नाही.
स्मृती इराणी, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री