अभिनेता आमीर खान याने असहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात त्याच्याविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात असतानाच लघुचित्रपटकार उल्हास पीआर यांनी त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिल्लीतील न्यू अशोकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल करण्यात आली.
देशात सामाजिक सलोख्याचे वातावरण राखणे, हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे ज्यावेळी आमीर खानसारख्या सेलिब्रिटींकडून काही वादग्रस्त वक्तव्ये केली जातात. त्यामध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे. कोणत्या समाजाबद्दल ते बोलत आहेत, कुठे लोक भितीच्या वातावरणामध्ये जगत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे उल्हास यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सांगितले.
आमीर खान प्रमुख अभिनेता असलेल्या ‘पीके’मध्ये पोलिसांना ठुल्ला म्हणण्यात आल्याबद्दल यापूर्वीही उल्हास यांनी त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कोणत्याही सेलिब्रिटींनी कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी आपले कर्तव्य काय आहे, याचा विचार केलाच पाहिजे. जर समाजामध्ये ते शांतता निर्माण करू शकत नसतील. तर त्यांनी लोकांमध्ये भीतीचे वातावरण तरी निर्माण नाही केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.