‘झी’ समूहाचे प्रमुख सुभाषचंद्र गोयल आणि त्यांचा मुलगा पुनीत यांची सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली पोलिसांनी कसून चौकशी केली. उद्योजक आणि काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांच्याकडे १०० कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.
वादग्रस्त कोळसा खाण वाटपांमधील कथित घोटाळ्याबाबतची वृत्तमालिका न प्रसारित करण्याच्या बदल्यात ‘झी’ने जिंदाल यांच्याकडून या खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. ‘झी’चे संपादक सुधीर चौधुरी आणि समीर अहलुवालिया यांना याप्रकरणी यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सुभाषचंद्र आणि पुनीत यांनाही शनिवारी रात्री चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. शनिवारी मध्यरात्री सुरू झालेली ही चौकशी रविवारी सकाळी साडेअकरा वाजता संपली. जिंदाल यांच्याकडून खंडणी मागितल्याची माहिती संपादकांनी तुम्हाला दिली होती का, आदी प्रश्नांची विचारणा अधिकाऱ्यांनी या पितापुत्रांना केल्याचे समजते. गोयल यांनी याप्रकरणी १४ डिसेंबपर्यंत हंगामी जामीन मिळवला आहे.