जम्मू-काश्मीर पोलिसांना उत्तर काश्मिरात झेलम नदीत एक मृतदेह सापडला असून तो हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर अब्दुल कय्यूम नाजर याचा असल्याचे सांगितले जात आहे. याच अब्दुल कय्यूम नाजरने उत्तर काश्मिरातील टेलिकॉम कंपन्यांचा व्यवहार पूर्णपणे बंद पाडला होता. हिज्बुल संघटनेचा प्रमुख सय्यद सलालह्हुदीन याने नाजर याची काही दिवसांपूर्वी संघटनेतून हकालपट्टी केली होती. झेलम नदी काठी वसलेल्या आणि श्रीनगर-बारामुल्ला महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या मिरगुंड या गावात दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दहशतवाद्यांना पळ काढण्यात यश आले होते, तर चार पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. दरम्यान, चकमकीत दोन दहशतवादी नदीत पडल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली होती. त्यानंतर घेतलेल्या शोधात नदीतून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, हा मृतदेह अब्दुल नाजर याचा असल्याची खात्री अद्याप पटलेली नाही. मात्र, हा मृतदेह नाजर याचा असल्याचे प्राथमिक संकेत दर्शवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.