पालक मुलांना शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये पाठवतात, त्यामुळे शिक्षण संस्थांच्या आवारात शांतता असायला हवी. शिक्षणसंस्था किंवा महाविद्यालयांच्या आवारात राजकारणाला थारा नको असे महत्त्वपूर्ण मत केरळ हायकोर्टाने मांडले आहे.

केरळमधील पोन्नणी येथे एमईएस महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा संप सुरु आहे. या आंदोलनात हस्तक्षेप करावा अशी मागणी करणारी याचिका महाविद्यालय प्रशासनाने हायकोर्टात केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने महत्त्वपूर्ण मत मांडले. पालक मुलांना शिक्षणासाठी महाविद्यालयात पाठवतात, त्यामुळे महाविद्यालयाच्या आवारात राजकारणाला थारा नाही, असे हायकोर्टाने सांगितले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या हायकोर्टाने विद्यार्थी संघटनांना इशारा दिला होता. शिक्षण संस्था या शिक्षणासाठी असतात, राजकारणासाठी नाही. राजकीय पक्ष हे शिक्षण संस्थांना वेठीस धरुन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून रोखू शकत नाही असे हायकोर्टाने म्हटले होते. विद्यार्थी महाविद्यालयात धरणे आंदोलन करत आहेत, असे विद्यार्थी संघटनांनी हायकोर्टात सांगितले होते. यावर महाविद्यालयाच्या आवारात अडथळे आणणाऱ्या विद्यार्थ्यांचे निलंबन करण्याचे अधिकार महाविद्यालय प्रशासनाकडे असतात, अशी आठवण विद्यार्थी संघटनांना करुन दिली होती.