* ६०० वर्षांतील पहिलीच घटना
* २८ फेब्रुवारी रोजी पदत्याग करणार
जगभरातील ख्रिश्चन धर्मीयांसाठी परमोच्च आदराचे स्थान असलेल्या पोपपदाचा राजीनामा देण्याची घोषणा विद्यमान पोप बेनेडिक्ट सोळावे (८५) यांनी सोमवारी केली. त्यांच्या या अनपेक्षित घोषणेमुळे जगभरातील ख्रिश्चन धर्मीयांत खळबळ उडाली आहे. वाढते वय आणि प्रकृतीच्या कुरबुरी यांमुळे आपण २८ फेब्रुवारीला पदाचा राजीनामा देत असल्याचे बेनेडिक्ट यांनी स्पष्ट केले आहे.  व्हॅटिकन सिटीत सध्या सुरू असलेल्या कॅथलिक चर्चच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पोप यांनी राजीनाम्याची घोषणा केली. पदावर असताना राजीनामा देणारे बेनेडिक्ट हे ६०० वर्षांच्या पोपपदाच्या इतिहासातील पहिलेच पोप आहेत. वाढते वय आणि प्रकृतीच्या कुरबुरी यांमुळे आपण आता पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकत नाही. त्यामुळे सद्सद्विवेकबुद्धीच्या आधारावर आपण या पदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ इच्छित असल्याचे बेनेडिक्ट यांनी स्पष्ट केले आहे. चर्चच्या हितासाठीच आपण राजीनामा देत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
अनपेक्षित घोषणा :   पोप जॉन पॉल यांच्या मृत्यूनंतर २००५ मध्ये बेनेडिक्ट यांची पोपपदी निवड झाली होती. साधारणपणे पोपच्या मृत्यूनंतर नव्या पोपची निवड करण्याचा रिवाज आहे. मात्र, बेनेडिक्ट यांच्या अनपेक्षित घोषणेमुळे ही प्रक्रिया पुढील महिन्याच्या मध्यात पार पडेल.
आता पुढे काय?
नव्या पोपच्या निवडीसाठी चर्च संस्थेतील सर्व प्रमुख येथे जमतील. या धर्मपरिषदेला ‘कॉनक्लेव्ह’ असे म्हटले जाते. हा शब्द ‘कम क्लेव्ह’ (अर्थ : किल्लीसह) लॅटिन भाषेतून हा शब्द आला आहे. १२७१ मध्ये व्हिटेबरे येथे पोपच्या निवडीसाठी बैठक सुरू होती. मात्र, पदासाठी कोणाची नियुक्ती करावी यात एकमत होत नव्हते. तब्बल ३३ महिने हा तिढा चालला. त्यामुळे व्हिटेबरेतील चिडलेल्या ग्रामस्थांनी या निवडकर्त्यांना एका खोलीत डांबून ठेवले व बाहेरून कुलुपे लावली. या सर्वाचे अन्नपाणी तोडले. ‘पोपची निवड करूनच बाहेर या’ असे सांगत किल्ल्या त्यांनी बरोबर नेल्या. म्हणून तेव्हापासून ‘कॉनक्लेव्ह’ हा शब्द रूढ झाला. त्यामुळे त्या दिवसापासून बंद खोलीत पोपची निवड होते. व निवडकर्त्यांचे अन्नपाणी दिवसागणिक कमीकमी केले जाते. त्यामुळे तेव्हापासून पोपची निवडप्रक्रिया फार लांबत नाही.