सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करणे महागात पडू शकते. काही लोक ‘मॉर्फ’ केलेले फोटो व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर टाकून बदनामी करू शकतात. असाच एक प्रकार गाझियाबादमधील विजयनगरमध्ये घडला आहे. एका तरुणाने तरुणीचे फोटो ‘मॉर्फ’ करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर तरुणाला अटक केली आहे. या तरुणाचे पीडित तरुणीशी लग्न ठरले होते. मात्र, त्याचे पहिले लग्न झाले असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी हे लग्न मोडले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या विजयनगरात राहणाऱ्या एका तरुणीचे या तरुणासोबत लग्न ठरले होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र, त्याचे पहिले लग्न झाले असल्याचे मुलीच्या कुटुंबीयांना समजले. त्यानंतर त्यांनी हे लग्न मोडले. लग्न मोडल्याने नाराज झालेल्या हरविंदरने पीडितेचे फोटो मॉर्फ करून ते फेसबुकवर अपलो़ड केले. अश्लिल फोटो व्हायरल झाल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधी पीडितेच्या कुटुंबीयांना दूरध्वनीद्वारे धमकीही देण्यात आली होती. माझ्याशी लग्न लावून न दिल्यास तरुणीच्या तोंडावर अॅसिड टाकण्यात येईल, अशी धमकी दिली होती. याबाबत पोलिसांना माहितीही देण्यात आली. तसेच या तरुणीने हा मोबाईल नंबर तपासला असता, तो दूरच्या नातेवाईकाचा असल्याचे समजले. त्याचदरम्यान, तरुणीच्या भावानेही पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. हरविंदरने रेल्वे प्रवासादरम्यान एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईल घेतला होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. हरविंदर याने अनोळखी व्यक्तीचा मोबाईल घेऊन त्यातील ईमेल आयडी घेतला होता. त्याद्वारे नवीन फेसबुक अकाऊंट सुरू करून तरुणीचे फोटो अपलोड केले होते, अशी माहिती चौकशीत समोर आली. पोलिसांनी हरविंदरला हरयाणातील पानीपत येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, हरविंदरचे पीडितेशी लग्न ठरले होते. कौटुंबिक कारणांमुळे लग्न मोडले होते. त्याच रागातून त्याने पीडितेचे अश्लिल फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. दरम्यान, पोलिसांनी हरविंदरला अटक केली असून, पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.