भाजपचा हक्काचा मतदार समजल्या जाणाऱ्या मध्यम वर्गाचा विचार करुन मोदी सरकारने नवी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत गृह कर्जावर ३ ते ४ टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींना या कर सवलतीचा लाभ मिळणार आहे. यासोबतच या वर्षी जानेवारी महिन्यानंतर घर खरेदी केलेल्या लोकांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत १२ लाखांपर्यंतच्या कर्जावर तीन ते चार टक्क्यांची सवलत मिळणार आहे. त्यामुळे गृहकर्जाचा हफ्ता दोन हजारांनी कमी होणार आहे.

‘मध्यमवर्ग फक्त आयकर देऊनच नव्हे, तर अन्य अनेक मार्गांनीदेखील अर्थव्यवस्थेच्या वाढीला हातभार लावत आहे. त्यामुळेच सरकारने मध्यमवर्गाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. घर खरेदीचे स्वप्न बाळगणाऱ्या मध्यम वर्गाला सरकारकडून सहाय्य केले जाणार आहे. याआधी सरकारकडून फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांनाच घर खरेदी करताना व्याज दरात सवलत देऊन मदत केली जात होती. मात्र आता पहिल्यांदाच वर्षाला १२ लाख आणि १८ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांनादेखील व्याज दरात सवलत मिळणार आहे,’ अशी माहिती गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

१२ लाख उत्पन्न असणाऱ्यांना ४ टक्के सूट
‘ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न आहे, त्यांना गृह खरेदी करताना नऊ लाखांच्या कर्जावर ४ टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने २५ लाखांचे घर खरेदी केले आणि त्यासाठी २० लाखांचे कर्ज घेतले असेल, तर त्याला ११ लाखांसाठी पूर्ण व्याज द्यावे लागेल. मात्र उर्वरित ९ लाखांवरील व्याज दरावर ४ टक्के अनुदान मिळेल. म्हणजे संबंधित व्यक्तीला ९ टक्के व्याजदराने कर्ज मिळाले असल्यास, त्या व्यक्तीला ११ लाखांच्या कर्जासाठी ९ टक्के दराने कर्जाची परतफेड करावी लागेल. मात्र उर्वरित ९ लाखांसाठी संबंधित व्यक्तीला ९ टक्क्यांऐवजी केवळ ५ टक्के दराने कर्जाची परतफेड करावी लागेल. मात्र यासाठी संबंधित व्यक्तीने ९० वर्ग मीटरचे घर खरेदी केलेले असावे, अशी अट असेल,’ अशी माहिती गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

१८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना ३ टक्के सूट
दुसऱ्या वर्गात १८ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना सवलत दिली जाणार आहे. ११० वर्ग मीटरपर्यंतचे घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला या सवलतीचा फायदा मिळणार आहे. १८ लाखांचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १२ लाखांच्या कर्जावर तीन टक्क्यांची सूट मिळणार आहे. म्हणजेच संबंधित व्यक्तीने ९ टक्के व्याजदराने कर्ज घेतले असल्यास त्याला १२ लाखांवरील कर्जाच्या रकमेवर ९ टक्क्यांऐवजी ६ टक्के दराने कर्जाची परतफेड करावी लागेल.