आमच्या बॅंडमुळे काश्मीरमधील लोक आणि मुफ्ती बशीरुद्दीन अहमद नाराज झाल्यामुळेच तो बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला, अशी प्रतिक्रिया काश्मीरमधील ‘प्रगाश’ बॅंडच्या किशोरवयीन मुलींनी मंगळवारी व्यक्त केली.
गायन हे इस्लामी परंपरेला धरून नाही. त्यामुळे गायन आणि संगीत थांबवा, असा फतवा महामुफ्ती बशीरुद्दीन अहमद यांनी काढल्यामुळे या मुलींनी आपला रॉक बॅंड सोमवारी बंद केला. आमचे संगीत इस्लामविरोधी असल्याचे मत मुफ्तीसाहेबांनी मांडले. त्यांच्या आणि काश्मीरमधील अन्य लोकांच्या मताचा आम्ही आदर करतो. त्यामुळेच आम्ही बॅंड बंद करीत आहोत. आमच्या या निर्णयामुळे खोऱयातील अन्य लोकांनीही आपले बॅंड बंद केले आहेत, असे या मुलींनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह काश्मीरमधील अन्य राजकीय नेत्यांनी या मुलींच्या निर्णयाला विरोध केला होता. मूठभर लोकांसाठी संगीताची सेवा सोडू नका, असे आवाहन त्यांनी या मुलींना केले होते. हुरियतचे नेते सयद अली शाह गिलानी यांनीही हा फतवा काढणाऱया मुफ्तीसाहेबांवर टीका केली.