भारताच्या वृद्धीदर कथेचा एक भाग होण्यासाठी देशातील शिक्षण संस्थांनी संशोधनावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.

अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी शैक्षणिक संस्थांमधून चांगले नेते आणि व्यवस्थापक निर्माण होण्याची गरज आहे. देशाची अर्थव्यवस्था अधिक गतीने पुढे जाण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी व्यवस्थापन संस्थांद्वारे त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे ते म्हणाले.

या वेळी जावडेकर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला येत असलेल्या विविध समस्यांबाबत आणि केंद्र सरकारकडून रोजगारनिर्मितीसाठी राबवण्यात येत असलेल्या कौशल्य निर्मिती कार्यक्रमांबद्दल माहिती दिली.

या समारंभासाठी यूजीसीचे अध्यक्ष वेद प्रकाश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिक्षण संस्था या जगातील सर्वात टिकाऊ संस्था असून, या संस्था समाजाला विकासाच्या पुढील टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी मदत करत असतात, असे वेद प्रकाश यांनी या वेळी म्हटले. या वेळी व्यवस्थापन विकास संस्थेचे (एमडीआय) अध्यक्ष संजय धांडे यांनीही कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित केले.

सर्व क्षेत्रांमध्ये नैपुण्य असणाऱ्यांची मोठी गरज

देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ करण्यासाठी सध्या सर्व क्षेत्रांमध्ये नैपुण्य (तज्ज्ञ) असणाऱ्यांची मोठी आवश्यकता आहे. देशाच्या विकासाच्या वाढीची कथा होण्याचा आपण एक भाग आहोत हे प्रथम लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे शिक्षण संस्थांनी संशोधनावर अधिक प्रमाणात लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे.