केंद्रीय मंत्री जावडेकर आक्रमक

वर्षांनुवर्षे रखडलेल्या पुणे मेट्रोला अंतिम मंजुरी देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्याचे साधे सौजन्यही पुणे महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस दाखवू शकली नाही. त्यांच्या या नतद्रष्ट प्रवृत्तीला पुणेकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, अशी घणाघाती टीका केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केली.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी मिळण्यापूर्वीच या मेट्रोचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा ठराव महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत बुधवारी सकाळीच करण्यात आला. श्रेयाच्या या राजकारणावर जावडेकर चांगलेच भडकले. ‘या प्रकल्पाला केंद्र व राज्य सरकार ४० टक्के निधी देणार आहे. ५९ टक्के निधी कर्जाद्वारे उभा केला जाईल. महापालिकेचा हिस्सा फक्त एक टक्का आहे,’ याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, ‘भरभरून देणाऱ्याचे मनापासून धन्यवाद मानण्याची पुणेकरांची संस्कृती आहे. मोदींचे आभार मानण्याऐवजी, त्यांना भूमिपूजनासाठी मानाने आमंत्रित करण्याऐवजी तुम्ही केवळ शरद पवारांना बोलाविता? पुणेकरांची दानत इतकी खालच्या पातळीची आहे का? माझा शरद पवारांनाच प्रश्न आहे की, आपल्या पक्षाच्या नेत्यांची ही कृती त्यांना मान्य आहे का? राष्ट्रवादीने फार संकुचित आणि नतद्रष्ट राजकारण केले. त्यांनी श्रेयासाठी हीन पातळी गाठली. त्यांना पुणेकर धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.’ पुण्याच्या विकासाला चालना दिल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधानांचे विशेष अभिनंदन केल्याचेही त्यांनी सांगितले.