पश्चिम बंगालमधील भांगर येथे भूसंपादनावरून आणि तामिळनाडूत जल्लीकट्टूवरून सुरू असलेल्या निदर्शनांचा संदर्भ देऊन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी, समाजातील वाढत्या संघर्षांबद्दल आणि मतभेदांबद्दल चिंता व्यक्त केली. एकमेकांबद्दलचा आदरभाव वाढविण्याची नितांत गरज असल्याचे मतही मुखर्जी यांनी व्यक्त केले.

सध्या वृत्तपत्र आणि दूरदर्शन पाहताना हिंसाचाराबाबतची वृत्तेच प्रकर्षांने दिसून येतात, आपण आंतरराष्ट्रीय िहसाचाराबाबत भाष्य करीत नाही, तर आपल्या मनातील, सदसद्विवेकबुद्धीमधील हिंसाचाराबद्दल बोलत आहोत, असेही राष्ट्रपती म्हणाले. येथे आयोजित करण्यात आलेल्या २८व्या दांतन ग्रामीण मेळ्याचे मुखर्जी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तेव्हा ते बोलत होते.

दररोज घडणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा घटनांबद्दल आपण बोलत आहोत, आंतरराष्ट्रीय हिंसाचाराबद्दल बोलत नाही, यापूर्वीही संघर्ष आणि मतभेद होते, मात्र आता दिवसेंदिवस ही स्थिती वाढत चालली आहे, असेही मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमधील भांगर येथील निदर्शने आणि तामिळनाडूत जल्लीकट्टूबाबतची निदर्शने यांचा थेट संदर्भ न देताच मत व्यक्त केले.

यापूर्वी अशा प्रकारचे छोटेमोठे संघर्ष स्थानिक पातळीवर टाळले जात होते, मात्र आता ते पसरत चालले आहेत, जग अधिक हिंसक बनत चालले असल्याबद्दल चिंता व्यक्त करून मुखर्जी म्हणाले की, समाजाचा हा सर्वसाधारण कल नाही, लोकांचे एकमेकांवर प्रेम होते, एकमेकांना स्वीकारण्याची भूमिका होती, नाकारण्याची नव्हे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत परस्परांबद्दलचा आदर वाढविण्याची नितांत गरज आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. यापूर्वी जनतेला हिंसाचाराबाबतची माहिती मिळत नसे, मात्र आता माध्यमांमुळे ते सहज शक्य झाले आहे.

दांतन ग्रामीण मेळ्याबाबत राष्ट्रपती म्हणाले की, अशा प्रकारच्या ग्रामीण मेळ्यांमुळे बंधुभाव, सलोखा निर्माण होतो. शहरी भागांत अशा प्रकारचा मेळा दिसणार नाही, अशा प्रकारच्या मेळ्यांमुळे समाजाच्या विविध घटकांमध्ये संपर्क निर्माण होतो, असेही ते म्हणाले.