आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध निवडणूक व्यवस्थापन आणि रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्यावर काँग्रेसला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यासाठी प्रशांत किशोर यांनी आता प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, योजनात्मक रणनीतीमधून गांधी घराण्याच्या अमेठी, रायबरेली या पारंपारिक मतदारसंघांसह सुलतानपूर जिल्ह्याला आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आले आहे. आम्हाला या तिन्ही ठिकाणी निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांची गरज नसल्याचा दावा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. या जिल्ह्यांतील प्रत्येक कार्यकर्त्याची निवड आणि संघटना बांधणी प्रियांका गांधी यांच्या देखरेखीखाली होते. त्यामुळे हे विभाग म्हणजे उत्तर प्रदेशातील इतर भागांसाठी आदर्श उदाहरण असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. अमेठी आणि रायबरेली याठिकाणचे कार्यकर्ते नेहमीच सक्रिय असतात. मात्र, या रणनीतीमधून सुलतानपूर जिल्हा का वगळण्यात आला , याचे कारण आम्हालाही माहित नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री यांनी सांगितले. कदाचित आमच्या चुकांमुळे याठिकाणी काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, प्रशांत किशोर यांनी आता काँग्रेसची मतदारसंघनिहाय रणनीती आखण्यास सुरूवात केली असून पहिल्या टप्प्यात त्यांनी प्रत्येक मतदारसंघाकडून लेखी अभिप्राय मागवले आहेत. यामध्ये काही प्रश्नांच्या उत्तरांसह संबधित मतदारसंघातील किमान २० निष्ठावान कार्यकर्त्यांची माहिती आणि संपर्क क्रमांक प्रशांत किशोर यांनी मागवले आहेत. मागील वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यासाठी काम पाहिले होते. या निवडणुकीत नितीश यांनी भाजपला धूळ चारली होती.