माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी व त्यांच्या सचिव ओमिता पॉल यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याने त्यांच्या विरोधात राष्ट्रपती भवनने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांना राष्ट्रपती सचिवालयाकडून २३ जूनला तक्रार प्राप्त झाली असून, त्यात २३ व २५ जूनला केलेल्या ट्विटचे फोटो समवेत जोडण्यात आले आहे. ८० पानांची एक फाइल जोडण्यात आली असून त्यात अंमलबजावणी संचालनालयाने ललित मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांची माहिती दिली आहे. कागदपत्रात राष्ट्रपती व त्यांच्या सचिव तसेच उद्योगपती विवेक नागपाल यांचे छायाचित्र आहे.
मोदी यांचे आरोप
मोदी यांनी केलेल्या आरोपानुसार अर्थमंत्री असताना मुखर्जी यांनी नागपाल यांना अनुकूलता दाखवली होती. मुखर्जी यांनी आयपीएलची कोची फ्रँचायझीच्या शेअर धारण सूत्राबाबत आपण शंका उपस्थित केल्या, त्यामुळे शशी थरूर यांना राजीनामा द्यावा लागल्याने आपल्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीचा ससेमिरा लावल्याची ट्विप्पणी केली होती. याबाबत अद्याप गुन्हा दाखल केलेला नसल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.