ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक मदनमोहन मालवीय यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. मालवीय यांच्या निधनानंतर तब्बल ६८ वर्षांनी देण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण समारंभास मालवीय यांच्या नाती हेम शर्मा, सरस्वती शर्मा, नातू प्रेमधर मालवीय व गिरधर मालवीय हे उपस्थित होते.
बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या निर्मितीबरोबरच हिंदू महासभेच्या प्रारंभीच्या संस्थापकांमध्येही मालवीय यांचा सहभाग होता.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, आदी मान्यवर उपस्थित होते. सरकारी शिष्टाचारानुसार सर्व माजी पंतप्रधानांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येते. परंतु मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेतेही या वेळी दिसले नाहीत.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल व संस्कृत भाषातज्ज्ञ जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांनाही राष्ट्रपती मुखर्जी यांनी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले.
ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता व रजत शर्मा यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १९४३ मधील जपान दौऱ्यात त्यांना सहाय्य करणारे, भारत-जपान मैत्रीचे पुरस्कर्ते, ९८ वर्षांचे साइचिरो मिसुमी यांनाही पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. याखेरीज, आशियाई क्रीडा सुवर्ण पुरस्कार विजेता सत्पाल, ‘फॉर्टीज इस्कॉर्ट’ हॉस्पिटलचे चेअरमन अशोक सेठ, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनाही पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये बॉलीवूडचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गीतकार प्रसून जोशी, एव्हरेस्ट विजेती अरुणिमा सिन्हा यांचा समावेश होता. प्रसिद्ध व्यंगचित्रकार ‘चाचा चौधरी’चे उद्गाते प्राणकुमार शर्मा यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या पत्नी आशा प्राण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.