गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला नागरिक शुभ्रा मुखर्जी यांनी संगीताच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.टागोरांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सायंकाळी नवी दिल्लीत स्पर्श नाटय़ रंग थिएटर आणि गीतांजली पथकाच्या वतीने एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर, खासदार हेमा मालिनी, अभिनेता मिथुन चक्रवर्ती, गायक शान मुखर्जी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांनी ‘नमो नमो करुणाघनो’ हे गुरुदेवांचे भजन गात या कार्यक्रमाची सुरेल सुरुवात केली. त्यानंतर हा टागोरांच्या विविध गाण्यांनी कार्यक्रम रंगत गेला, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक अजित चौधरी यांनी दिली.
गाण्याची आवड असलेल्या शुभ्रा मुखर्जी यांनी १९८२ साली गीतांजली पथकाच्या स्थापनेला हातभार लावला होता.