भारतीय इतिहास संशोधक परिषदेचे अध्यक्ष येलप्रगडा सुदर्शन राव यांनी सूत्रे घेतल्यानंतर अवघ्या सोळा महिन्यातच राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे कारण व्यक्तिगत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनुष्यबळ विकास खात्याने त्यांचा १.५ लाख रूपये मानधनाचा प्रस्ताव फेटाळला होता. त्यांनी सांगितले की,‘ मी राजीनामा दिला असून मंत्रालयाच्या प्रतिसादाची वाट पाहात आहे.’ काकटीय विद्यापीठातून निवृत्त झालेल्या राव यांची अध्यक्षपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. राव यांची नियुक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित होती व राव हे अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे सदस्य होते. ही योजना संघाची होती. इतिहास तज्ज्ञ रोमिला थापर यांनी राव यांच्या नियुक्तीवर टीका केली होती.
राव यांनी सांगितले की, मी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा देत आहे व यावर मंत्रालयाकडून प्रतिसाद आल्याशिवाय पुढे काही सांगणार नाही.
राव यांनी त्यांचा राजीनामा मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना २४ नोव्हेंबर रोजी पाठवला आहे. राव यांच्या मानधनाचा प्रस्ताव संस्थेच्या ८१ व्या सर्वसाधारण बैठकीत चर्चेला आला होता त्याला सदस्यांनी पाठिंबा दिला होता व नंतर तो प्रस्ताव मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता.
दरम्यान, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राव यांचा राजीनामा व्यक्तिगत कारणास्तव असून तो आम्हाला मिळाला आहे व त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. भारतीय इतिहास संशोधक परिषदेचे अध्यक्ष हे मानद पद आहे. अनेकांच्या मते राव हे वादग्रस्त होते. त्यांनी पूर्वीच्या काळची जात व्यवस्था योग्य होती असे ब्लॉगवर म्हटले होते व त्यावर टीकाही
झाली.