विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू सुशांत दत्तगुप्ता यांची हकालपट्टी करावी, अशी शिफारस करणारी मानव संसाधन विकास मंत्रालयाने पाठविलेली फाइल राष्ट्रपतींच्या कार्यालयातून काही प्रश्न उपस्थित करून तीन महिन्यांत दुसऱ्यांदा परत पाठविण्यात आली आहे.

कुलगुरूंवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांचे व्यक्तिश: म्हणणे काय आहे ते न ऐकणे कायदेशीरदृष्टय़ा समर्थनीय आहे का, असा प्रश्न उपस्थित करून ही फाइल परत पाठविण्यात आली
आहे. दत्तगुप्ता यांना स्पष्टीकरणाची संधी न देणे कायदेशीरदृष्टय़ा समर्थनीय आहे का, असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून ही फाइल मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दत्तगुप्ता यांनी ई-मेलद्वारे पाठविलेला राजीनामा स्वीकरण्यात यावा हा मंत्रालयाकडून आलेला प्रस्तावही फेटाळण्यात आला असून, दुसऱ्यांदा ही फाइल मंत्रालयाकडे परत पाठविण्यात आली आहे. त्यापूर्वी सप्टेंबर महिन्यांत फाइल परत पाठविण्यात आली होती. दत्तगुप्ता यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांबाबत कायदेशीर मत जाणून घ्यावे, असेही सांगण्यात आले
होते.