राजकारणात मी जी वाटचाल केली आणि माझी जी काही जडणघडण झाली त्यामध्ये संसदेचा वाटा सिंहाचा आहे असं म्हणत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सेंट्रल हॉल सभागृहात उपस्थितांचे आभार मानले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निरोप समारंभ देण्यात आला त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रणव मुखर्जींना सगळ्या खासदारांच्या सह्या असलेलं एक पुस्तक भेट दिलं. निरोपाचं भाषण करताना प्रणव मुखर्जींच्या डोळ्यात तरल भाव साठले होते.

लोकशाहीच्या मंदिरात अर्थात संसदेत माझ्या विचारांना पैलू पडले, मी या संसदेची निर्मिती आहे असं म्हटलं तर चुकीचं वाटायला नको, २२ जुलै १९६९ हा माझा संसदेतला पहिला दिवस होता. निरोपाचं भाषण करताना मला संसदेतला पहिला दिवस आठवतो आहे, राष्ट्रपती म्हणून मी आता या सभागृहाचा निरोप घेतो आहे हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणिय आहे.

या सभागृहाशी असलेली माझी बांधिलकी याहीपुढे कायम राहिल, १९६९ पासून आजवर या सभागृहात मी अनेक घडामोडी पाहिल्या आहेत. विरोधी बाकांवरच्या खासदारांची भूमिकाही मी पाहिली आहे आणि सत्ताधारी पक्षांचीही भूमिका पाहिली आहे. संसदेतले गदारोळही पाहिले आहेत आणि एखाद्या घटनेवर किंवा विधेयकावर होणारी एकवाक्यताही पाहिली आहे. मी गेल्या ३७ वर्षांमध्ये अनेक बदल पाहिले आहेत. आता हे सभागृह सोडताना हे सगळं काही माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आहे असंही प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांनीही भाषण केलं. प्रणव मुखर्जी यांचा देशाच्या राजकारणात आणि आर्थिक विकासात मोठा वाटा आहे असं पाटील यांनी म्हटलं आहे. एखाद्या मंत्र्याचं संसदेतलं वर्तन किती आदर्श असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रणव मुखर्जी आहेत असंही पाटील यांनी म्हटलं आहे. सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळ्याच पक्षाच्या खासदारांनी आणि दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. उपराष्ट्रपती हमीद अन्साराही या कार्यक्रमाला हजर होते. रामनाथ कोविंद हे २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. तर प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी म्हणजेच सोमवारी संपतो आहे.