राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात काँग्रेसने मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्ष असलेल्या मीरा कुमार या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी मीरा कुमार यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार उभा करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षांची गुरुवारी दिल्लीत बैठक पार पडली. विरोधी बाकावरील काँग्रेससह १७ पक्षांच्या नेते या बैठकीत उपस्थित होते. बैठकीपूर्वी डाव्या पक्षाच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर किंवा पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाला पसंती दर्शवली होती. त्यामुळे या दोघांपैकी एकाची निवड होणार असे चित्र दिसत होते. मात्र बैठकीत काँग्रेसने मीरा कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. मीरा कुमार यांच्या नावावर अन्य विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्यात काँग्रेसला यश आले.

पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते गुलाम नवी आझाद म्हणाले, मीराकुमार यांनी सामाजिक न्यायासाठी लढा दिला. आयएफएस अधिकारी असताना त्यांनी जगभरात भारतासाठी काम केले. बहुजन समाज पक्ष, लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही मीराकुमार यांच्या नावाला पाठिंबा दिला. ‘नितीशकुमार यांनी पुनर्विचार करावा, महाआघाडी न तोडता  पुन्हा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा’ असे आवाहन लालूप्रसाद यादव यांनी केले.

यूपीएच्या कार्यकाळात त्या मंत्री होत्या. तर २००९ ते २०१४ या कालावधीत त्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या.  ७२ वर्षीय मीरा कुमार मूळच्या बिहारच्या असून त्यादेखील काँग्रेसचा दलित चेहरा आहेत. विशेष म्हणजे कोविंद हेदेखील दलित समाजाचे नेते आहेत. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी दलित उमेदवार दिला आहे.

नितीशकुमार यांचा जद (यू) आणि नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असून जद (एस) आणि भारतीय राष्ट्रीय लोकदल यांनीही असेच संकेत दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसची मीराकुमार यांच्यासाठी मतांची जुळवाजूळव करताना दमछाक होणार असे दिसते.