राष्ट्रपतिपदाचे स्वप्न भंगले अन् प्रदीर्घ कारकिर्दीच्या उत्तुंग शेवटाची संधीही हिरावली

गुजरात दंगलीनंतर स्वत:चे मुख्यमंत्रिपद वाचविणाऱ्या भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणींना ‘गुरूदक्षिणा’ देण्याचे औदार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न दाखविल्याने अडवानींचे भव्य स्वप्न दुसऱ्यांदा भंगले. अगोदर पंतप्रधानपद आणि आता राष्ट्रपतिपदाची संधी नाकारल्याने प्रदीर्घ कारकिर्दीचा उत्तुंग सन्मान होण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली.

पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाला विरोध केल्यापासून ते जवळपास विजनवासातच गेले होते. पण तरीही राष्ट्रपतिपदासाठी अडवानींचे नाव पहिल्यापासून चर्चेत होते. गुजरात दंगलीनंतर मोदींचे गुजरातचे मुख्यमंत्रिपद वाचविणारया अडवानींचे ऋण फेडण्यासाठी मोदी त्यांना राष्ट्रपतिपदाची ‘गुरूदक्षिणा’ देतील, अशी भाबडी आशा संघपरिवारातील अनेकांना होती. तसेच अडवानींचे पक्षामधील भरीव योगदान लक्षात घेऊन त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा उत्तुंग समारोप करण्याचीही भावना अनेकांमध्ये होती. त्यातच बाबरीप्रकरणी सीबीआयने पुन्हा आरोपपत्र दाखल करूनही अडवानींचे मौन विलक्षण महत्वाचे मानण्यात येत होते. यापाठीमागे त्यांना राष्ट्रपतिपदासाठी दिलेला शब्द असावा, असा कयास केला जात होता. त्यातच मागील आठवडय़ात राजनाथसिंह व व्यंकय्या नायडू या दोन मंत्र्यांनी त्यांची भेट घेतल्याने शक्यता वर्तविली जात होती.

पण हे सगळे तर्क केरात निघाले असून अडवानींच्या नशिबी पुन्हा एकदा स्वप्नभंगाचे दु:ख आले आहे. अडवानींना संधी नाकारण्यामागे त्यांच्याबद्दल मोदींच्या मनात असलेला अविश्वस हे महत्वाचे कारण असल्याचे सांगण्यात येते.